मुंबई महानगरात उन्हाळ्याच्या दिवसांत संभाव्य पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. यानुसार शहरातील विहिरींतील पाणी उपशावर विविध निर्बंध लादण्यात येणार असून पालिकेची परवानगी बंधनकारक करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे विहिरींमधील लाखो लिटर पाण्याचा राजरोस होणारा उपसा थांबणार असून बांधकामाच्या कामांसाठी पाणी अपुरे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख तलावांमधील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत १ लाख ५० हजार दशलक्ष लिटरने कमी आहे. यामुळे उन्हाळ्यात संकट वाढू नये म्हणून पालिकेने १०% पाणी कपात कायम ठेवली असून ती वाढण्याची शक्यता आहे. सध्या इमारतींची बांधकामाची कामे तसेच काही हॉटेलचालक पिण्याव्यतिरिक्त कामासाठी विहिरींचे पाणी वापरतात. मुंबई शहर आणि उपनगरात पूर्वी २५ ते ३० हजार विहिरी होत्या, पण विकासकामामुळे अनेक विहिरी बुजल्या असून पालिकेच्या नोंदणीनुसार सध्या जेमतेम १२ विहिरी शिल्लक आहेत, तर प्रत्यक्षात दक्षिण मुंबई आणि उपनगरात मिळून ५ ते ७ हजारांच्या घरात अशा विहिरी आहेत.
या सर्व विहिरी खासगी मालकीच्या असल्यामुळे त्यातील पाण्यावर पालिकेचे नियंत्रण नव्हते आणि टँकरद्वारे लाखो लिटर पाणी विकले जात होते. यातून विहीरमालकांना प्रतिटँकर २०० ते ५०० रुपये मिळत होते तर टँकरचालक १० ते १२ हजार लिटरचा टँकर १ हजार २०० ते १ हजार ३०० रुपयांना विकत होते. दक्षिण मुंबईत जुन्या इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान विहिरी काढल्या जात असल्याच्या आणि पाणी आटत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. यावर प्रशासनाने विहिरी वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
इतिहास पाहता, नळाचा पुरवठा सुरू होण्यापूर्वी लोक विहिरींवर अवलंबून होते आणि गिरगाव, भुलेश्वर, काळबादेवी, वांद्रे, माहीम, वरळी येथे शेकडो विहिरी होत्या. उन्हाळ्यात विहिरींचे पाणी कमी होत असल्याने पालिकेने भूजल पातळी वाढवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. लवकरच सर्व उपनगरातील विहिरींचा सर्व्हे करून त्यांची अधिकृत संख्या जाहीर केली जाणार आहे.