मुंबई आणि महानगर भागाच्या आगामी ५० वर्षांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी कोयना धरणातील पाणी मुंबईकडे वळविण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशी मागणी ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोयना धरणाचे काम १९५६ मध्ये सुरू होऊन १९६४ मध्ये पूर्ण झाले होते. त्या काळात वीजनिर्मिती ही राज्याची गरज असल्याने बोगद्याद्वारे पाणी वशिष्ठी नदीत सोडून जलविद्युत प्रकल्प उभा केला गेला. १९६४ च्या दरम्यान धरणातील ११० टीएमसी पाण्यापैकी ६७.५० टीएमसी पाणी जलविद्युत निर्मितीसाठी आणि ४२.५० टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी ठरविण्यात आले होते.
या पाणीवाटपानुसार पुढील काळात पाटण, कराड, ईश्वरपूर, विटा, पलूस, तासगाव या शहरांसह कुंडल, मणेराजुरी, कासेगाव आणि नदीकाठच्या अनेक गावांसाठी पिण्याच्या योजना उभ्या राहिल्या. तसेच पाटण, कराड, ईश्वरपूर, विटा, पलूस, कडेगाव, तासगाव आणि मिरज तालुक्यातील शेतकरी परवाना घेऊन शेतीसाठी पाण्याचा वापर करत आहेत. दुष्काळी भागासाठी ताकारी ९.३४ टीएमसी, टेंभू २२.०३ टीएमसी पैकी १८ टीएमसी कोयनेतून आणि विस्तारित टेंभू ८ टीएमसी अशा उपसा सिंचन योजनांद्वारे कोयनेच्या एकूण ३४.३५ टीएमसी पाण्यावर शेतीचे नियोजन झाले आहे. पूर्वी वीजनिर्मितीसाठी जलविद्युत हा प्रमुख पर्याय होता, पण आज सातारा आणि सांगली जिल्ह्यात पवन व सौर ऊर्जेतून मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होत असून या पर्यायांकडे लोकांचा कल वाढला आहे.
निसर्गाच्या नियमानुसार व नैसर्गिक उतारानुसार कोयना धरणाच्या पाण्यावर सातारा व सांगली जिल्ह्याचाच अधिकार असून या पाण्यावर मुंबईचा कोणताही हक्क नाही, असा दावा ॲड. मुळीक यांनी केला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांची आगामी ५० वर्षांतील वाढती लोकसंख्या आणि शेतीची गरज पाहता, कोयनेतील ४२.५० टीएमसी पाणी सुद्धा या भागाला कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांच्या नैसर्गिक अधिकारानुसार हे पाणी स्थानिक नागरिकांनाच मिळायला हवे, असे या निवेदनात म्हटले आहे.
या सर्व घडामोडींमुळे मुंबईच्या पाणी नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकारी व शासन यावर काय निर्णय घेतात, याकडे दोन्ही बाजूंच्या नागरिकांची नजर लागली आहे. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिरिरीने मांडलेल्या या भूमिकेमुळे पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून आगामी काळात यावर काय कायदेशीर व प्रशासकीय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.