नवी मुंबई आणि कोकण परिसरातील दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे मधील पनवेल ते बदलापूर दरम्यानचा ४ किमी लांबीचा बोगदा तयार झाला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील बोगदा पूर्ण झाला असून दुसऱ्या बोगद्याचे ९०% काम प्रगतीपथावर आहे. येत्या दोन महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण करून डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या नव्या मार्गामुळे पनवेल ते बदलापूर प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच मुंबईहून थेट दिल्लीला जाण्यासाठी पूर्वी २२ ते २४ तास लागायचे, ते आता १२ ते १४ तासांवर येणार आहेत. सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या महामार्गातील पॅकेज १७ मधील हा भाग रायगडमधील पनवेल आणि ठाण्यातील बदलापूरला जोडणारा ठरला आहे.
संबंधित प्रशासकीय माहितीनुसार, या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचेलच, पण जेएनपीए बंदराच्या मालवाहतुकीला मोठा फायदा मिळणार आहे. यापूर्वीची कंटेनर वाहतूक नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी मार्गे जात होती. आता ती या नव्या बोगद्यावरून वळवली जाणार असल्याचा दावा केला जात आहे.
या बदलामुळे पनवेल, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि भिवंडी परिसरातील नागरिकांची दररोजची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. देशभरातून येणारी आयात आणि निर्यात अधिक जलदगतीने पार पडण्यास मदत होऊन स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.