ठाणे जिल्ह्यातील खडवली पश्चिम भागात कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न मागील 1 वर्षभरापासून कायम आहे. या भागातील उद्योगांमुळे परिसरामध्ये विद्रूपता वाढत असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येबाबत अनेकदा अर्ज देण्यात आले, तसेच माध्यम आणि बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. पण, परिस्थितीमध्ये कोणताही सुधारणा झालेली दिसत नाही, ज्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीस बजावून कागदपत्रे, परवानग्या आणि व्यवसायाची माहिती मागितली होती. तसेच माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता, तरीही प्रत्यक्षात हे उद्योग अजूनही सुरूच आहेत. एवढेच नाही तर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो आणि तो उघड्यावर जाळला जाण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या 29 ऑक्टोबर रोजी या समस्येबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळी नेऊन वास्तव दाखवण्यात आले होते, पण तरीही ठोस बदल झाला नाही असा दावा केला जात आहे.
गेल्या 18 नोव्हेंबर रोजी नागरिकांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर केला, पण त्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विचारणा केल्यानंतर प्रशासनाकडून 2025 मध्ये दिलेली जुनीच नोटीस 2026 मध्ये पुन्हा बजावल्याचे सांगण्यात आले. वारंवार अर्ज करूनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला असून प्रशासनाने नक्की काय पावले उचलली, याचा खुलासा मागितला जात आहे.
संबंधित उद्योगांची कसून तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. परिसरातील वाढता कचरा आणि प्रदूषणाचा हा प्रश्न लवकरात लवकर कायमस्वरूपी सोडावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यामुळे भविष्यात आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळू शकेल.