नवी मुंबई मधील तुर्भे परिसरातील श्रीरामतनु माता-बाल रुग्णालयात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, तेथील डॉ. सौरभ बोरसे याने एका महिला रुग्णाचा विनयभंग केला होता. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला होता. ही घटना घडल्यानंतर आठवडा लोटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती, ज्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
या गंभीर प्रकारामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिला वर्गात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. उपचारासाठी गेल्यास संबंधित डॉक्टर आपल्याला तपासणीसाठी असेल आणि आपल्याबाबतही अशी घटना घडल्यास काय, अशी भीती महिला रुग्णांच्या मनात घर करून राहिली होती. अनेक महिलांनी आपली ही भीती लोकप्रतिनिधींकडे बोलून दाखवली होती, त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका कविता पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे जाऊन या डॉक्टरवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
इतकी मोठी आणि गंभीर घटना घडूनसुद्धा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रशासनाला वेळेत माहिती देणे आवश्यक असताना तसे झाले नाही. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवायला आठवड्याचा कालावधी लागला, ज्यामुळे पालिकेच्या आरोग्य सेवेची प्रतिमा मलीन झाली. दरम्यान, या डॉक्टरवर नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालय येथे कालावधीतही विशाखा समितीकडे महिलांच्या लैंगिक छळाची तक्रार आल्याचे उघड झाले असून, त्यामध्येही तो दोषी आढळल्याचा अहवाल मिळाला होता.
डॉ. बोरसे याच्या वारंवार घडणाऱ्या अशा कृत्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर असलेला जनतेचा विश्वास कमी झाला असून जनप्रक्षोभ वाढीस लागला आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल संध्याकाळी उशिरा या डॉक्टरला निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे प्रशासनातील शिस्त कायम राहण्यास मदत होईल आणि महिलांच्या सुरक्षेबाबत कठोर संदेश जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.