मुंबई जिल्हा बँक निवडणुकीबाबत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, यामध्ये महायुतीमधील प्रमुख पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. भाजप आणि शिवसेना सहकार पॅनेलच्या माध्यमातून संयुक्तपणे रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली असून, यामध्ये दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी एकाच पॅनलमधून लढण्याचे ठरवले आहे.
सध्या मुंबई जिल्हा बँकेवर भारतीय जनता पक्षाचे मजबूत वर्चस्व असून या बँकेच्या संचालक मंडळात २० सदस्य आहेत. या मंडळात भाजप नेते प्रसाद लाड, तेजस्विनी घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत सुद्धा यामध्ये आहेत. याआधी शिवसेना शिंदे गटाकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू होती आणि पाडव्याच्या मुहूर्तावर बाळासाहेब भवन येथे महत्त्वाची बैठकही पार पडली होती.
शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस भाजप नेते प्रविण दरेकर, सचिन अहिर आणि नेते उदय सामंत उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित लढण्याबाबत सहमती झाली आहे. दरम्यान, जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असून याबाबत CM देवेंद्र फडणवीस तसेच Deputy CM एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेणार आहेत.
आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत पक्षश्रेष्ठींची पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक पार पडणार असून त्यानंतर अधिकृत जागा वाटप निश्चित होईल. या घडामोडीमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे या निवडणुकीकडे विशेष नजर लागली असून, आगामी काळात सहकार पॅनेलची रचना कशी असेल हे लवकरच स्पष्ट होईल.