उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल १० महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे आता पालिकेच्या सभापती निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या समितीवर कोणत्या ज्येष्ठ नगरसेवकांना संधी मिळणार याकडे सर्वांची नजर लागली होती. एक अनुभवी आणि दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा शहरात रंगली होती.
सभागưहातील पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीत शिवसेनेचे सर्वाधिक ९, भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे २, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एमआयएमचा प्रत्येकी १ सदस्य समाविष्ट आहे. शिवसेनेकडून दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी यांना स्थान मिळाले आहे. मात्र नेते एकनाथ शिंदेंनी नावे जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे.
सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर, संजय भोईर यांसारख्या अनेक दिग्गजांना पहिल्या वर्षी संधी मिळालेली नाही. यातील बरेच जण सभापती पदाच्या शर्यतीत होते. तसेच एका प्रकरणात नाव आल्यामुळे मिनाक्षी शिंदे यांनाही बाजूला सारण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
यंदा सदस्यांना कमी अवधी मिळणार असला तरी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचाच सभापती बसणार हे स्पष्ट आहे. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या या महत्त्वाच्या समितीवर अनपेक्षित चेहऱ्यांना संधी मिळाल्याने डावलण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी पसरण्याची दाट शक्यता आहे.