आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांच्या सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विकास आराखड्याची उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंदिर परिसर, पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून लाखो भाविक येत असतात. भविष्यात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन नियोजन विभागामार्फत विकास आराखड्याचे तीन महत्त्वाचे टप्पे राबविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील सुमारे १४८ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्प्यातील २८८ कोटी रुपयांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
या कामांमध्ये पार्किंग सुविधा, भक्तनिवास, बसस्थानक, दर्शनबारी मार्ग, खेड-भीमाशंकर रस्त्याचे उन्नतीकरण तसेच विविध मंदिरांच्या परिसराचा विकास यांचा समावेश आहे. नुकतीच मंजुरी मिळालेल्या तिसऱ्या टप्प्यात भीमाशंकर गावाचा पुनर्विकास, मंदिर परिसरातील आधुनिक सुविधा आणि भाविकांसाठी अधिक सक्षम व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
एकूण ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या या विकास आराखड्यामुळे भीमाशंकर परिसराला नवी ओळख मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे, नैसर्गिक वारसा जपणे आणि गुणवत्तापूर्ण कामांना प्राधान्य देणे याबाबत सुनेत्राताई पवार यांनी संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या.
या विकास आराखड्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातील आर्थिक विकासालाही नवी दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
श्रद्धा, विकास आणि रोजगारनिर्मिती यांचा समतोल साधत भीमाशंकरला राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.